7 November 2024
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक व्यापक वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात त्यांनी सामाजिक, आर्थिक, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी विविध योजना व सुविधा देण्याची ग्वाही दिली आहे.
संस्कार:
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामुळे छत्रपतींच्या विचारांना अधिक बळकटी मिळेल.
अन्नसुरक्षा:
गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पाच वर्षांसाठी स्थिर ठेवण्याचे आश्वासन देत, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे संपूर्ण मूल्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील.
महिला:
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र २४x७ महिला पोलिस ठाण्यांची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करण्यात येईल. महिलांना अधिक आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचेही आश्वासन दिले आहे.
आरोग्य:
प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल.
शिक्षण:
जात, धर्म, पंथ न पाहता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल, असे या वचननाम्यात नमूद केले आहे.
पेन्शन योजना:
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.
शेतकरी:
‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार शेतकऱ्यांना हमखास भाव देण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
वंचित समूह:
वंचित समूहांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना केली जाईल.
मुंबई:
धारावीकरांसाठी त्यांच्या उद्योगांना सुविधा देणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले आहे.
उद्योग आणि पर्यावरण:
बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करून पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल.
या वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले आहे.