top of page

उद्धव गटाला आणखी एक धक्का संजय राऊत यांचे निकटवर्तीय मा. नगरसेवक उपेंद्र सावंत शिवसेनेत जाहीर प्रवेश

उद्धव गटाचे विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक आणि संजय आणि सुनील राऊत यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सकाळचा भोंगा ज्या विक्रोळीतून वाजतो त्याच विक्रोळीच्या माजी नगरसेवकाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत बंधूंना 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा आहे.उपेंद्र सावंत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना सावंत यांनी गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या भागाचा विकास करता येणे शक्य होत नसेल तर कसे चालणार असे म्हणत आपल्या प्रभागातील विकासकामाना गती मिळावी यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या 33 झाली असून त्यातील 25 हे उबाठा गटाचे असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी त्याना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.निवडणूक घेण्याची हिम्मत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे असे सांगितले. उलट शिवसेनेची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी असून कधीही निवडणुका लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.


Comments


bottom of page