top of page

99 लोकांचा खूनी !

1 November 2024


नैराश्य एक असा मानसिक आजार आहे जो व्यक्तीला आंतरिक दृष्टया खूप कमजोर करतो. याचे मुळ कारण पाप करणे आहे. जेंव्हा मानव गुन्हे करतो तेंव्हा त्याच्या मनावर एका काळा डाग निर्माण होतो. आणि एक दिवस असा येते की संपुर्ण हृदयच काळे होते. या अवस्थेत, माणूस आपल्या जीवनाची सकारात्मकता हरवून बसतो आणि त्याला जगण्याची प्रेरणा मिळत नाही. नैराश्यामुळे व्यक्तीला असहाय्यता आणि निराशा जाणवते, ज्यामुळे तो स्वतःला एकाकी आणि हतबल समजतो. यातून बाहेर पडण्यासाठी, कधी कधी तो स्वतःला संपवण्याचे विचार करतो, ज्यामुळे आत्महत्या सारखे अत्यंत गंभीर निर्णय घेण्याची शक्यता वाढते. अशा वेळी योग्य उपचार आणि सकारात्मक वातावरण मिळणे अत्यावश्यक असते. पण काही लोकं यातुन यशस्वी रित्या बाहेर निघतात. त्याचे कारण असे की ते आत्मचिंतन करतात. खऱ्या मनाने पश्चाताप करतात आणि अल्लाह दरबारी आपले गुन्हे कबूल करतात की त्याने असे करायला नको होते. एकांतपने रात्रीच्या अंधारात जेंव्हा सर्व गाढ झोपेत असतात तो गुन्हेगार झोपत नाही अल्लाहशी दया क्षमा मागतो. हे करतांना त्याचे अश्रू अनावर होऊन जातात. अल्लाहला त्याची ही अदा पसंत पडते, आणि तो त्याला पश्चाताप करण्याचे मार्ग दाखवतो. ही सत्य घटना अशा एका महापापी गुन्हेगाराची आहे ज्याने अनेक पाप केलेले असतात परंतु त्याला आपल्या या गुन्ह्यांवर प्रश्चाताप होतो आणि तो मनाने पश्चाताप करण्यासाठी मार्ग शोधतो. आणि त्याला मार्ग भेटतो.

    अशीच एक विलक्षण कथा म्हणजे बनी इस्राईलच्या एका व्यक्तीची, ज्याने 99 निरपराध जीवांचा वध केला. ही कथा केवळ एका पापी आत्म्याच्या तौबाच्या प्रयत्नांची नाही, तर ती अल्लाहच्या अथांग दयेची आणि मानवी मनाच्या परिवर्तनीय शक्तीची देखील द्योतक आहे.

     बनी इस्राईलच्या त्या व्यक्तीच्या जीवनात हिंसा आणि क्रूरता यांची अशी काही परिसीमा होती की, त्याने 99 जीवांचा बळी घेतला. त्याच्या अंत:करणात पापाचा भार इतका मोठा झाला की अखेर त्याच्या मनात आपले जीवन सुधारण्याची इच्छा निर्माण झाली. त्याला पश्चाताप झाले आणि खऱ्या मनाने तो प्रायश्चित करण्याचे मार्ग शोधु लागला. त्याकरिता त्याने एका साधूला भेटून विचारले, "माझ्यासाठी तौबा करण्याची संधी आहे का?" परंतु साधूने कठोरपणे उत्तर दिले की, "तुझ्यासारख्या पापीला तौबा करण्याची संधी नाही." हे वाक्य एकूण त्याची आत्मा अस्वस्थ झाली  आणि तो अधिक कठोर बनला. आणि संतापाच्या भरात त्याने त्या साधूचाही वध केला.

    शंभराव्या हत्येनंतरही त्याच्या मनाला शांती मिळाली नाही. अखेर त्याने एका ज्ञानी माणसाकडे जाऊन आपली कथा सांगितली. त्या ज्ञानी माणसाने त्याच्या हृदयातील पश्चात्ताप ओळखला आणि त्याला तौबा करण्याचे मार्गदर्शन दिले की, "तू तुझ्या जुन्या मार्गाचा त्याग कर आणि नवजीवनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाक," असा सल्ला देत त्याने त्या व्यक्तीला नीतिमान लोकांच्या गावाकडे जाण्यास प्रवृत्त केले.

    पण नशिबाचे नियोजन कधीच आपल्या हातात नसते. आपल्या नवनिर्मितीच्या प्रवासात असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. स्वर्ग(जन्नत) आणि नरकातले (दोजख ) फरिश्ते (देवदूत) आपसात भांडू लागले की याची आत्मा कोण नेणार?जन्नत वाला म्हणाला की मी याला जन्नत मध्ये येऊन जाईल आणि नर्क वाला म्हणाला की मी याला नरकात येऊन जाईल. हे भांडत असताना  अल्लाहने त्यांना आदेश दिला की, तो व्यक्ती जिथे मृत्युमुखी पडला त्यापासून तो ज्या गावी जाणार होता त्याचे अंतर कमी आहे की जास्त हे मोजून घ्या. त्या व्यक्तीचे निघालेल्या मार्गाची दिशा पाहिली जावी. अल्लाहच्या आज्ञेने जमीनीने स्वतःला नीतिमान लोकांच्या गावाच्या दिशेने झुकवले, आणि त्या व्यक्तीची आत्मा अल्लाहच्या दयाळूपणाच्या छायेत राहिली. म्हणजेच जन्नतच्या फरीश्त्यांनी त्याची आत्मा ताब्यात घेतली आणि अल्लाहने त्या महापापीला जन्नत प्रदान केली. कारण की त्याने स्वच्छ  मनाने आत्मचिंतन केले होते. आणि मनाने तौबा केली होती म्हणून अल्लाहने त्याचे एवढे पाप त्याच्याकडून घडले असताना देखील त्याला माफी दिली व जन्नत मध्ये स्थान प्रदान केले. 

    ही सत्य घटना आपल्याला एक धडा शिकविले कि, अल्लाहची दया  असिमित आहे. जरी मानवाने कितीही मोठे पाप केले असले तरी, खऱ्या अंत:करणाने केलेले आत्मचिंतन व तौबा त्याला अल्लाह कडून माफीच प्रदान करते.

        यावरून आम्हाला हे ही लक्षात येते की पाप कितीही गंभीर असो अल्लाहच्या तौबाचा द्वार नेहमीच उघडा असतो. तौबा ही काही  साधी प्रक्रिया नाही, ती आपल्या आत्म्याच्या पुनरुत्थानाची आणि आत्मशुद्धीची संधी प्रदान करणारी असते. ही कथा आपल्याला सांगते की, जर आपल्यात सत्याची तळमळ असेल तर आपल्याला नवीन जीवनाची सुरुवात करण्याची संधी नेहमीच मिळू शकते.

    त्या ज्ञानी माणसाने सुज्ञ लोकांच्या गावात जाण्याचा सल्ला देऊन आपल्याला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. नीतिमान लोकांची संगत आपल्याला बदलण्यासाठी प्रेरित करू शकते, आपली दिशा बदलू शकते, आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करु शकते.

   हे देखील  आपल्या लक्षात आले असेन कि अल्लाहचा न्याय नेहमीच दयाळूपणावर आधारित असतो. त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी जमिनीने आपली दिशा बदलली, ही एक प्रतीकात्मक घटना आहे जी आपल्याला अल्लाहच्या उदार होण्याची आठवण करून देते.

    बनी इस्राईलच्या या व्यक्तीची कथा आपल्याला शिकवते की, जीवनात कितीही अंधार असला तरी, आत्मचिंतन आणि तौबाचे दिवे आपल्या मार्गाला प्रकाशमान करू शकतात. अल्लाहची दया कधीही कमी होत नाही, आणि मानवाचे अंत:करणातील पश्चात्तापाचे अश्रू त्याला नेहमीच प्रिय असतात.

     म्हणून जे लोक गुन्हे करतात, पाप करतात ज्यामुळे त्यांचे हृदय पाषाना सारखे होतात, गुन्हे करत करत हृदय काळसर पडतो, ज्यामुळे तो अंधकारमय जीवन जगतो. नैराश्यतेतून त्याला असे समजते की हे जीवन काहीच कामाचे नाही आणि तो निराश होतो.अल्लाहने दिलेले अनमोल जीवन वाया घालू लागतो. किंवा  मानसिक रोगी होतो. एक वेळ अशी येते की तो आत्महत्या करण्याचा विचार करतो.  जर या कथेवर आम्ही गांभीर्याने विचार केले तर असे नैराशी लोकांसाठी यामध्ये एक मोठा धडा आहे की नैराश्येतून निघण्याचा मार्ग आहे,पण खरे आत्मचिंतन आणि पश्चातापाची गरज आहे. जर असे नैराशी माणसाने खरी तौबा केली आत्मचिंतन केले  तर अवश्य अल्लाह त्याला माफ करतो.  म्हणून नैराश्यातून बाहेर निघा, आत्मचिंतन करा, पश्चाताप करा,गुन्हेपासून दूर रहा आणि अल्लाह दरबारी स्वच्छ आणि सहृदय   खरी तौबा करा.  तुमची तौबा अवश्य अल्लाह कबूल करेल, ज्यामुळे तुमचे हे जीवन आणि मरणोत्तर जीवन सफल होईल.

आसिफ खान

               धामणगाव बढे

9405932295

bottom of page